शिवथरघळ

शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.

. . . शिवथरघळ . . .

शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन १६६० पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली लावून दिला.

पायऱ्या चढून आल्यावर समोरच ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.

शिवथरघळ धबधबा द्रुश्य

१) शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.

२) दुसरा मार्ग जरा अवघड आहे. पुण्याहून निघून राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर, गोप्याघाट, कसबे शिवथर मार्गे घळीत पोहोचता येते. हा मार्ग तसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.

. . . शिवथरघळ . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . शिवथरघळ . . .

Previous post सत्य युग
Next post महाराष्ट्रातील आरक्षण